गेल्या २० वर्षांपासून
दुष्काळाला गावाच्या वेशीबाहेरच अडवून ठेवलेले हिवरे बाजार हे पाण्याचे ऑडिट
मांडणारे देशातील पहिले गाव ठरले आहे.
पाण्याचे योग्य नियोजन
केल्यामुळे या गावाची अर्थव्यवस्थाही बदलली.
उन्हाळ्यातही आमच्याकडे भरपूर पाणी आहे याचा आनंद साजरा करण्यासाठी हे गाव पुढील
आठवड्यात जलोत्सव साजरा करणार आहे. या गावाचा धडा इतरांनीही गिरवायला हवा.
........
राज्यावर दुष्काळाचे
संकट कोसळले आहे. प्यायला पाणी नाही, जनावरांना
चारा नाही, कडाक्याच्या उन्हाने
शेतातील पिके जळून खाक झाली आहेत... असे विदारक चित्र प्रत्येक जिल्ह्यातून, गावातून पाहायला मिळत
आहे. मात्र त्याचवेळी अहमदनगर जिल्ह्यात खडकावर वसलेल्या आणि पाटपाण्याची कोणतीही
सुविधा नसलेल्या 'हिवरे बाजार' या गावाने पाणीटंचाईवर
१०० टक्के यशस्वी मात केली आहे. गेल्या २० वर्षांपासून या गावाने दुष्काळाला
आपल्या वेशीत शिरकाव करू दिला नाही. उर्वरित महाराष्ट्राने त्यापासून खूप काही
शिकण्यासारखे आहे.
नगर शहरापासून १६
किलोमीटर अंतरावरील कल्याण रोडवर हिवरे बाजार नावाचे एक छोटेखानी खेडे आहे. जेमतेम
१३०० लोकसंख्या आणि गावातील जमिनीचे क्षेत्र २५ हजार एकराचे. गाव खडकावर वसल्याने
जमीन खडकाळ आणि मुरमाड या प्रकारची. पाटाच्या पाण्याची किंवा जलसिंचनाची कोणतीही
व्यवस्था नाही. सर्व काही पावसावर अवलंबून. पाऊस पडला तर शेत पेरायचे, नाहीतर जमीन पडीक ठेवून
पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेरच्या गावात स्थलांतरित व्हायचे, अशी या गावची अगदी
गेल्या काही वर्षांपूवीर्पर्यंतची परिस्थिती होती. पण ती पोपट पवार या गावातीलच
एका तरुणाने पालटून टाकली. तरुणांना, वडिलधाऱ्यांना
संघटित केले. 'आपल्या गावातच पाणी
निर्माण करू, त्यासाठी पाणलोटाची
चळवळ राबवू' हा मंत्र पोपटरावांनी
गावकऱ्यांना दिला. पाण्याच्या आशेने अख्खा गाव त्यांच्यामागे उभा राहिला.
श्ामदानाने माथा ते पायथा अशा पद्धतीने पाणी अडवण्यासाठी चर-खोदाईचा कार्यक्रम
राबविला.
गावाच्या परिसरात तीन
पाणलोट उभारले गेले. पावसाळ्यात पावसाचे पाणी जमिनीत जिरू लागले. त्यामुळे
विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. चमत्कार घडावा तसे या खडकाळ गावातही पाणी दिसू
लागले. उपलब्ध पाण्याच्या वापराचे नियोजन करण्यासाठी सरपंच पोपट पवार यांनी
१९९५पासून पाण्याचा ताळेबंद राबविण्यास सुरुवात केली. तीनही पाणलोटाच्या ठिकाणी
प्रत्येकी तीन विहिरी खोदण्यात आल्या. प्रत्येक पाणलोटावर एक पर्र्जन्यमापक यंत्र
बसविले. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून ते पावसाळा संपेपर्यंत दररोज पावसाच्या, तसेच विहिरीच्या
पाण्याची पातळी किती वाढली,
याच्याही
नोंदी ठेवल्या गेल्या. हे काम गावातील मराठी शाळेच्या आणि यशवंत विद्यालयातील
विद्यार्थ्यांकडे सोपविले गेले. ते आजपर्यंत अविरत चालू आहे.
पडणारा पाऊस व त्यातून
उपलब्ध होणारे पाणी शेताला किती व प्यायला किती वापरायचे याचा ताळमेळ घालण्यासाठी
या गावात वर्षातून तीनदा ग्रामसभा होतात. पावसाळ्यात किती मि.मी. पाऊस पडला, भूगर्भातील पाणीपातळी
किती वाढली, याचा ताळा मांडण्यासाठी
ऑक्टोबरमध्ये पहिली ग्रामसभा होते. खरीप व रब्बी हंगामात कोणती पिके घ्यायची, याचे नियोजन
डिसेंबर-जानेवारी महिन्यांत होणाऱ्या ग्रामसभेत केले जाते. पाण्याच्या
उपलब्धतेनुसार उन्हाळ्यात कोणती पिके घ्यायची, तसेच अगोदर पिण्यासाठी, नंतर फळबाग पिके व त्यानंतर इतर पिके अशा पद्धतीने पाणी
वापराचे धोरण फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या ग्रामसभेत ठरते.
पडणारा पाऊस व त्यातून
उपलब्ध होणारे पाणी पिकांना किती व पिण्यासाठी किती राखून ठेवायचे, याचे सूत्र अभ्यास करून
निश्चित करण्यात आले आहे. ते सूत्र असे : समजा १०० मि.मी. पाऊस पडला, तर वर्षभराचा
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. २०० मि. मी. पाऊस पडल्यावर खरिपाची पिके
घ्यावीत. ३०० मि. मी. पाऊस झाल्यावर रब्बी पिके घ्यावीत. ३०० मि.मी.पेक्षा अधिक
पाऊस झाल्यास उन्हाळी पिके घ्यावीत. या सूत्राचा वापर काटेकोरपणे हिवरे बाजार
गावात केला जातो. गेल्या वषीर् १९० मि.मी. इतकाच पाऊस झाल्याने यंदा उन्हाळी पीक
घेण्यात आलेले नाही.
या गावात २०१०मध्ये ३५०
मि.मी पाऊस झाला. गेल्या वषीर् तो कमी होऊन १९० मि.मी. झाला. त्यामुळे पाणी टंचाई
जाणवू नये, याची सावधगिरी गावाने
घेतली. १० फेब्रुुवारीला विशेष ग्रामसभा घेऊन पाणी कमी असल्याने उन्हाळी पीक
घ्यायचे नाही, पिण्यासाठी व फळबाग
शेतीसाठीच पाणी वापरावे असा निर्णय घेतला. सध्या या गावात एकही उन्हाळी पीक नाही.
मात्र डाळिंब, चिकू यांच्या फळबागा
हिरव्यागार आहेत. चारा आहे. पिण्याच्या पाण्याची ओढाताण नाही. पाणी पातळी १५ ते ४०
फुटांवर आहे. १६पैकी ११ हातपंपांना भरपूर पाणी आहे. २९४पैकी २७९ विहिरींनाही मुबलक
पाणी आहे. पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे १९९५पासून पाणी टंचाई नाही. उलट
शेजारची जखणगाव, टाकळी, गणेशवाडी, पिंपळगाव ही गावे
पिण्यासाठी, जनावरांसाठी हिवरे
बाजारचे पाणी वापरतात.
गेल्या २० वर्षांपासून
हिवरे बाजारने दुष्काळाला गावाच्या वेशीबाहेरच अडवून ठेवले आहे. पाण्याचे ऑडिट
मांडणारे देशातील हे पहिले गाव ठरले आहे. पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे या
गावाची अर्थव्यवस्थाही बदलली. फळबागा वाढल्या, दूध उत्पादन वाढले. यामुळे गाव सधन होऊ लागले आहे.
१३००पैकी अवघी तीन कुटुंबे दारिद्यरेषेखाली राहिली आहेत, एवढी प्रगती या गावाने केली आहे. उन्हाळ्यातही आमच्याकडे
भरपूर पाणी आहे याचा आनंद साजरा करण्यासाठी हे गाव पुढील आठवडयात जलोत्सव साजरा
करणार आहे. घराघरात पुरणपोळीचे जेवण व घरासमोर गुढ्या उभारल्या जाणार आहेत.
पाणी जिरवा व मुरवा हे
दुष्काळग्रस्त जनतेने शिकले पाहिजे;
तर
पाटपाणी वापरणाऱ्या बागायतदारांनी पिकांना ठिबक सिंचनाने पाणी द्यावे, पाण्याची उधळपट्टी करू
नये असा लाखमोलाचा संदेश हिवरे बाजारच्या गावकऱ्यांनी दिला आहे. अगदी आता
आतापर्यंत दुष्काळाचे सावट झेलणाऱ्या एका छोट्या गावाने घालून दिलेला हा धडा
सर्वांनीच गिरवला, तर दरवषीर् दुष्काळाने
गांजणारे चेहरे, देशोधडीला लागणारी
कुटुंबे आणि दुष्काळाचेही केले जाणारे राजकारण हे चित्र संपून सारा महाराष्ट्रच
जलोत्सवाच्या आनंदात न्हाऊन निघेल.